कोरोना विषाणू १९’ची जगभरात साथ आली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. भारत सरकार देशात याचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी प्रत्येक नागरिकाने याविषयी समजून घेऊन सतर्क असणे आणि आवश्यक ती उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. 

१. ‘कोरोना विषाणू १९’ काय आहे ?

‘कोरोना विषाणू १९’ विषाणूमुळे सर्दीसारख्या सामान्य रोगापासून श्‍वसनसंस्थेचे गंभीर आजार होऊ शकतात.

२. हा आजार कुठल्या माध्यमातून पसरतो ?

अ. हा आजार ८० टक्के वेळा हातांच्या माध्यमातून पसरतो.

आ. या जंतूंमुळे प्रदूषित झालेले परदेशगमन कक्ष, तिकीट कक्ष, दरवाजाची हँडल्स, जिना किंवा लिफ्टमधील हँडल्स यांना हात लावल्यावर, तसेच हात न धुता चेहरा, डोळे किंवा नाक यांना स्पर्श केल्यावर हा आजार पसरतो.

इ. थेट हवेमधून विषाणू  पसरण्याचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अल्प आहे.

ई. हा विषाणू गर्दीच्या ठिकाणी पसरतो. शाळा, संस्था, विमाने, वातानुकूलित बस, वातानुकूलित रेल्वेचे डबे, इत्यादी ठिकाणी हा रोग पसरण्याचे प्रमाण अधिक असते.

उ. ‘कोरोना विषाणू १९’ची साथ असलेल्या अन्य राष्ट्रांतून (उदाहरणार्थ चीन, इटली, स्पेन, अमेरिका, इराण इत्यादी) भारतात आलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून हा विषाणू देशात पसरतो.

३. आजाराची लक्षणे 

‘कोरोना विषाणू १९’ची  बाधा झाल्यापासून लवकरात लवकर २ दिवस आणि उशिरा म्हणजे १४ दिवसांपर्यंत कधीही त्याच्या आजाराची लक्षणे शरिरात निर्माण होऊ शकतात. या लक्षणांमध्ये ताप येणे, खोकला येणे, श्‍वासोच्छ्वास करण्यास त्रास होणे, स्नायू दुखणे, सर्दी, जुलाब होणे आदींचा समावेश आहे.

४. आजार होऊ नये, यासाठी प्रतिदिन करावयाच्या प्रतिबंधात्मक कृती

अ. हात न धुता डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श करू नये.

आ. अन्न शिजवण्यापूर्वी, स्वयंपाक करतांना आणि स्वयंपाक बनवून झाल्यानंतर, खाण्यापूर्वी, शौचालयात जाऊन आल्यानंतर, जेव्हा हातांवर पुष्कळ धूळ बसलेली असेल, तेव्हा नळाच्या वाहत्या पाण्याखाली साबणाने हात धुणे किंवा अल्कोहोल असलेला ‘हँड क्लिनर’ वापरणे, जनावरे, जनावरांचे खाद्य किंवा जनावरांची विष्ठा यांच्या संपर्कात आल्यास, हस्तांदोलन केल्यावर, तसेेच खोकला किंवा शिंक आल्यावर, रुग्णसेवा केल्यानंतर हात धुवावेत. जेव्हा हातावर अधिक प्रमाणात धूळ बसलेली असेल, तेव्हा ४० सेकंद वाहत्या पाण्याखाली साबणाने हात धुवावेत. हातावर धूळ अल्प प्रमाणात असेल, तेव्हा ७० टक्के किंवा अधिक प्रमाणात अल्कोहोल असलेल्या साबणाने (हाताला लावण्याच्या द्रावणाने) हात स्वच्छ करावेत.

इ. खोकतांना किंवा शिंकताना घेण्याची काळजी

इ १. खोकतांना किंवा शिंकतांना चेहर्‍यावर टिश्यू  पेपर किंवा रूमाल किंवा सदर्‍याची बाही धरावी. (हातांचा वापर अजिबात करू नये.)

इ २. वापरलेला टिश्यू  पेपर लगेच कचरापेटीत टाकून कचरापेटी त्वरित बंद करावी.

इ ३. रुग्णसेवा करणार्‍याने खोकला किंवा शिंक आल्यावर हात साबण आणि पाणी वापरून किंवा हाताला लावण्याच्या अल्कोहोल मिश्रित द्रावणाने स्वच्छ करावेत.

इ ४. अन्न शिजवतांना घ्यावयाची काळजी

१. कच्चे अन्न (उदा. भाजी) हाताळल्यानंतर हात साबणाने धुवावेत.

२. आजारी जनावरे आणि खराब झालेले मांस यांच्याशी संपर्क टाळावा.

३. भटकी जनावरे, बाजारातील टाकाऊ पदार्थ आणि द्रव पदार्थ यांच्याशी संपर्क टाळावा.

४. जिवंत असलेल्या जंगली, पाळीव किंवा शेतीला उपयोगी प्राण्यांशी असुरक्षित संपर्क टाळावा.

५. जनावरे किंवा जनावरांपासून मिळणारी उत्पादने हाताळतांना सुरक्षेसाठी योग्य सदरा, हातमोजे किंवा मास्क घालावेत.

६. ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव असेल, तिथे मांसापासून केलेले पदार्थ खातांना सावधगिरी बाळगावी. हे पदार्थ योग्य प्रकारे शिजवलेले आहेत, याची निश्‍चिती करावी. अन्न तयार केल्यावर योग्य रितीने  हाताळले जाईल, असे पहावे.

७. ‘कोरोना विषाणू १९’ची लक्षणे असणार्‍या रुग्णाच्या संपर्कात रहाणे टाळावे. तसे रहावे लागल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. त्या सल्ल्यानुसार आवश्यक ती काळजी घ्यावी.

८.  सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.

९. कामावर असतांना काम झाल्यावर कामावरील संरक्षणात्मक कपडे काढून ठेवावेत, अ‍ॅप्रन प्रतिदिन धुवून कामाच्याच ठिकाणी ठेवावेत.

१०. कामावरून आल्यानंतर घामाने भिजलेले कपडे आणि बूट यांच्याशी कुटुंबातील इतर सदस्यांचा संपर्क टाळावा.

११. अनावश्यक प्रवास करू नये.

१२. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या चीन किंवा दक्षिण आशिया, युरोप, अमेरिका, इराण यांसारख्या देशांमध्ये प्रवास करणे टाळावे.

१३. शासकीय यंत्रणांकडून देण्यात येणार्‍या सूचनांच्या संदर्भात सतर्कता ठेवून त्यानुसार उपाययोजना करावी.

१४. दूरभाष, प्रसिद्धीमाध्यमे, सामाजिक प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमांतून देण्यात येणार्‍या केवळ अधिकृत माहितीसंबंधी सतर्कता ठेवून उचित कृती करावी.

५. आजाराची लक्षणे दिसल्यास काय करावे ?

अ. ताप, खोकला किंवा श्‍वासोच्छ्वास करण्यास त्रास होत असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घेऊन आवश्यक ते उपचार घ्यावेत.

आ. लक्षणे असलेल्या व्यक्तीने घरात रहावे. सार्वजनिक ठिकाणी लोकांशी प्रत्यक्ष संपर्क करू नये.

६. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नेहमी आणि योग्य पद्धतीने मास्क वापरण्याची पद्धत

अ. शस्त्रकर्म करतांना वापरण्यात येणारा तीन थर असलेला मास्क ९० टक्के प्रभावी असतो.

. जेव्हा आजारी असू किंवा आजारी माणसांशी संपर्क होणार असेल, रुग्णालयात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणार असू, तेव्हा मास्कचा वापर करावा.

इ. मास्क ४ ते ८ घंटे वापरून झाल्यावर टाकून द्यावा.

ई. साधारणपणे ज्याला श्‍वसनसंस्थेची लक्षणे नाहीत त्यांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही.

७. इतर काही महत्त्वाच्या कृती

अ. ‘कोरोना विषाणू १९’च्या बाधेसारखी लक्षणे असणार्‍या आजारी माणसांपासून एका हातापेक्षा (१ मीटरपेक्षा) अधिक अंतरावर रहावे.

आ. नैसर्गिक प्रकाश आणि हवेशीर जागेत रहावे.

इ. आपण वापरत असलेल्या वस्तूंचा पृष्ठभाग १ टक्का ‘लायसोल’ या द्रावणाने निर्जंतुक करावा.

ई. भरपूर झोप घ्यावी.

उ. भरपूर पाणी प्यावे, तसेच पोषक अन्न घ्यावे.

– डॉ. पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

Source – Dainik sanatan prabhat mon 16 march 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here