clock

‘सध्या कोरोना विषाणूच्या (Corona virus च्या) भीतीमुळे समाजात ‘मास्क’च्या वापराविषयी अनेक संभ्रम आहेत. त्यासाठी ‘मास्क’चे प्रकार आणि ‘तो कसा वापरावा ?’, याविषयी महत्त्वाची माहिती अन् सूचना पुढे दिल्या आहेत.

१. जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) टाळण्यासाठी सर्वसाधारणपणे २ प्रकारचे मास्क वापरले जातात. 

१ अ. ‘सर्जिकल मास्क’

१. हे कापडी ‘मास्क’ सहजपणे उपलब्ध असतात. हे ‘मास्क’ प्रामुख्याने आतून बाहेर जाणारे (नाक किंवा तोंड यांवाटे होणारे) जंतूसंसर्ग रोखण्यासाठी वापरले जातात. ज्या व्यक्तीला सर्दी किंवा खोकला झाला आहे, त्या व्यक्तीने हा ‘मास्क’ वापरावा. या ‘मास्क’मुळे त्याची सर्दी किंवा खोकला यांचे शिंतोडे (ड्रॉपलेट्स) सभोवतालच्या वातावरणात पसरत नाहीत आणि जंतूसंसर्ग रोखला जातो.

२. हा ‘मास्क’ तोंडवळ्यावर लावतांना काही वेळा पूर्णपणे नीट बसत नाही. त्यामुळे श्‍वासावाटे बाहेरून आत जाणारा जंतूसंसर्ग रोखण्यात या ‘मास्क’चा फार उपयोग होत नाही.

३. ‘मास्क’ वापरतांना तो ‘नाक आणि तोंड पूर्णपणे झाकेल’, अशा प्रकारेच असला पाहिजे.

४. ‘मास्क’ तोंडवळ्यावर लावतांना किंवा काढतांना त्याच्या पुढील भागाला स्पर्श करू नये. ‘मास्क’ पाठीमागून त्याच्या दोर्‍या धरून काढावा किंवा घालावा. हाताच्या स्पर्शाने ‘मास्क’वर जंतूंचे संक्रमण होऊ शकते. ते अधिक धोकादायक ठरू शकते.

५. प्रतिदिन नवीन ‘मास्क’ वापरणे आवश्यक आहे. अनेक दिवस एकच ‘मास्क’ वापरल्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचा संभव असतो.

६. हे ‘मास्क’ एकदाच ७ – ८ घंटे वापरल्यावर फेकून द्यावेत. या ‘मास्क’ची प्रतिदिन योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

७. ‘मास्क’चे लाभ मर्यादित असले, तरी गर्दीच्या ठिकाणी जातांना आपण त्याचा वापर करू शकतो.

८. हा ‘मास्क’ उपलब्ध नसल्यास मोठा सुती रूमाल त्रिकोणी घडी करून ‘नाक-तोंड झाकले जाईल’, अशा पद्धतीने बांधावा. तो रूमाल प्रतिदिन गरम पाण्यात साबणाने धुऊन वापरू शकतो.

१ आ. N 95 ‘मास्क’

१. हे ‘मास्क’ विशिष्ट प्रकारचे असून ते महाग असतात. त्यात एकदा वापरून फेकून द्यावे लागणारे (डिस्पोजेबल) आणि ‘मास्क’च्या आतील ‘फिल्टर’ पालटून पुन्हा वापरता येणारे (रियुजेबल) असे २ प्रकार असतात. या ‘मास्क’मध्ये असलेल्या ‘फिल्टर’मुळे जंतू (व्हायरस) आत येण्यास प्रतिबंध केला जातो.

२. या प्रकारच्या ‘मास्क’मुळे बाहेरून आत जाणारा जंतूसंसर्ग (इन्फेक्शन), सूक्ष्म धूलीकण आणि घातक वायू (गॅसेस) रोखले जातात.

३. कोरोना विषाणूने (Corona virus ने) किंवा अन्य जंतूने (virus ने) बाधित रुग्णांचे उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांनी (डॉक्टर्सनी), आरोग्य कर्मचार्‍यांनी आणि रुग्णसेवा करणार्‍या सर्वांनी ‘रुग्णांपासून स्वतःला जंतूसंसर्ग होऊ नये’, यासाठी हा ‘मास्क’ वापरणे आवश्यक असते.

४. सर्वसामान्य जनतेने काहीही त्रास नसतांना साथीत केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी हा ‘मास्क’ वापरण्याची आवश्यकता नाही.

२. ‘जंतूसंसर्ग होऊ नये’, यासाठी घ्यावयाची काळजी !

सध्या ज्यांना सर्दी, खोकला, ताप इत्यादी कोणताही त्रास नाही, त्यांनी भीतीपोटी कोणताही ‘मास्क’ वापरायची आवश्यकता नाही. त्याऐवजी ‘जंतूंचा प्रादुर्भाव होऊ नये’, यासाठी इतर काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे, उदा. ‘गर्दीच्या ठिकाणी जाणे, इतरांशी हस्तांदोलन करणेे, तोंडवळ्याला हाताचा स्पर्श करणे’, या गोष्टी टाळाव्यात. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावेत. शिंकतांना किंवा खोकतांना तोंडावर रूमाल धरावा किंवा तोंडावर हात न ठेवता हाताचा दंड (कोपराचा वरचा भाग)ठेवून शिंकावेे. घसा दुखू लागल्यास कोमट पाण्यात मीठ आणि हळद घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.’

– आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२०)

Courtesy – Dainik Sanatan Prabhat web site.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here